NCP Won MLC Election : एकच वादा अजितदादा; विधानपरिषदेच्या निकालात १०० टक्के स्ट्राइक रेट, दोन्ही उमेदवार विजयी

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण राज्याच्या राजकारणात उत्सुकतेची ठरलेल्या विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे दोन्ही उमेदवार विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाला आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाल्याचे कळताच पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. सभागृहाच्या पायऱ्यांवर एकच वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा, अजितदादा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर ५ वर्षांनी गुलाल पडला, राजकीय वनवास अखेर संपला!

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटातील मते फुटतील अशी शंका व्यक्त केली जात होती. पक्षातील नाराज आमदारांची मते फुटतील असे बोलले जात होते. त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवारांना धोका असल्याचे म्हटले जात होते.

सुनिल तटकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विजयानंतर पक्षाचे खासदार सुनिल तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी शिक्कामोर्तब केला आहे. माझ्या आयुष्यात माझ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा हा सर्वात जास्त आनंदाचा दिवस आहे, असे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीची एक जागा पडेल असे जे बोलत होते त्यांना आमदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. आजच्या निकालाने खुप खुप आनंद झालाय. अनेक वेळा फार मोठे आव्हान असल्याचे चित्र निर्माण केले जाते. मात्र आम्हाला विश्वास होता की विजय मिळणारच. आम्ही आमच्या गुणवत्तेवर विजय झालो आहोत. अजून बेरीज वाढेल असेही तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

आम्हाला विजयाचा विश्वास होता. हा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीची एक झलक होती. पक्षातील आमदारांची मते शरद पवार गटाला मिळतील अशी चर्चा होती, यावर बोलताना तटकरे म्हणाले- मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, दादांचा अभिमान आहे. त्याशिवाय आमच्या पक्षाशिवाय इतर जी मते मिळाली त्यांचीबद्दल आभार आणि ऋण मी व्यक्त करतो.