मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना वरळी अपघाताबाबत तसेच पीडित कुटंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही विचारण्यात आले असता आम्ही पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वरळी हिट अॅंड रन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे तसेच जे पब आणि बार रात्री उशीरापर्यंत चालतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी पहिल्या दिवसांपासूनच दिले आहेत. पुण्याच्या प्रकरणातही मी अशाचप्रकारे आदेश दिले होते. त्यानंतर झालेली कारवाई सर्वांनी बघितली. वरळीच्या प्रकरणातही कारवाई सुरू आहे. जे अवैध काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.
पीडित कुटुंबाला आर्थिक कुटुंबाला आर्थिक मदत देणार का असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी, आम्ही पीडित कुटुंबाच्या बरोबर आहोत. ते आमच्याच परिवारातील सदस्य आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांना जी काही मदत लागेल, मग ती कायदेशीर असो, किंवा आर्थिक असो, त्यांना मदत केली जाईल. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
दरम्यान, या वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणी याआधी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं म्हटलं होतं. कोणी श्रीमंत असो, मंत्र्यांची मुलं असो, किंवा कोणी कोणत्याही पक्षाशी निगडित असला तरी तरी त्याला पाठीशी घालणार नाही. कोणावरही अन्याय होऊ देणार नसून माझं प्रशासन पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभं, असा विश्वास व्यक्त केला होता.