माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले आहे. मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर शिखर बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची तीन गोदामे सील केली. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली होती. या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
या कारवाईच्या विरोधात कारखान्याने कर्ज वसुली लवादाकडे धाव घेऊन अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर शिखर बँकेने हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. कारखान्याकडे मोठी थकबाकी असून, ती परत करण्याचे निर्देश कारखान्याला द्यावेत, अशी मागणी बँकेने केली. लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. वास्तविक, हा वाद न्यायप्रविष्ट असून, कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही असे बँकेच्या वकिलांनी मागील तारखेला सांगितले होते. तरीही बँकेने कारखान्याचे साखर साठविलेले तीन गोदाम सील केले. ही कृती अयोग्य आणि लहरीपणाची आहे, असे नमूद करून गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश दिले. या राजकीय घडामोडींमुळे माढ्यातील निवडणुकीत आणखी रंगत भरली आहे.
अभिजित पाटील यांना जनतेचा पाठिंबा असून, त्यांच्या मनात आमच्याबद्दल आस्था आहे. ती लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणले. त्यांच्या कारखान्यातील दहा लाख टन साखर जप्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे, कामगारांचे वेतन अडकून बसले. शेवटी पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला. त्याबाबत मी त्यांना दोष देत नाही. परंतु, राज्यकर्ते कोणत्या टोकाला जातात, याचे हा कारखाना उत्तम उदाहरण आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला असून, सीलबंद गोदामे खुली झाल्याने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शिखर बँकेने सहकार्य केले आहे.
– अभिजित पाटील, अध्यक्ष, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर