वाढवण बंदर उभारणीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे, तर जगभरातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत मोठे बंदर असेल. त्यानुसार बंदरावरून जहाजांद्वारे सामानाची ने-आण करण्यासाठी हे बंदर रस्ते व रेल्वेशी थेट जोडणे अनिवार्य आहे. यादृष्टीने ‘जेएनपीए’ने नियोजन केले आहे. त्याअंतर्गत वाणगावजवळ ‘नवीन पालघर’ हे विशेष रेल्वे स्थानक उभे होणार आहे. वाढवण बंदरापासून या स्थानकापर्यंत १२ किमी लांबीची विशेष रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. त्याद्वारे वाढवण बंदरापर्यंत सामानाची वाहतूक विना-व्यत्यत होऊ शकेल.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बंदर रेल्वेखेरीज मुंबई-दिल्ली कॉरिडॉरअंतर्गत बांधल्या जात असलेल्या नवीन महामार्गाशीही जोडले जाणार आहे. हा महामार्ग वाढवणपासून २२ किमी अंतरावर आहे. त्यासाठी विशेष रस्ता बांधला जाणार आहे. तसेच सध्याचा राष्ट्रीय महामार्ग ४८ (प्रामुख्याने मुंबई-अहमदाबाद महामार्ग) वाढवणपासून ३४ किमी अंतरावरील तवा या ठिकाणी आहे. वाढवण ते तवा असा विशेष रस्तादेखील बांधला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात यांचा समावेश
– प्रस्तावित बंदर डहाणू शहराच्या दक्षिणेकडील वाढवणच्या किनाऱ्यापासून जवळपास दीड किमी आत दोन टप्प्यांत नव्याने वसवले जाणार आहे.
– त्यामध्ये एकूण नऊ टर्मिनल असतील.
– बहुउपयोगी चार धक्के, दोन द्रवयुक्त कार्गोसाठीचे धक्के, एक मोठ्या सामानांसाठीचा धक्का, रो-रो धक्का या सर्वांचा पहिल्या टप्प्यात समावेश असेल.
– हा टप्पा २०२९पर्यंत बांधून पूर्ण होईल.
– त्यानंतर दुसरा टप्पा २०३४ ते २०३७ या दरम्यान गरजेनुसार विकसित होईल.
३२ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार
यादरम्यान वाढवण बंदरामुळे प्रत्यक्ष १२ लाख आणि अप्रत्यक्ष ३० ते ३२ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचे नियोजन आहे, असे ‘जेएनपीए’कडून सांगण्यात आले.