मैत्रिणीकडून त्याला शहापूरला नेलं, दोन दिवस लपवलं, मिहीरची आई, दोन बहिणी पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, मुंबई: वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मिहीर शहा याला शोधण्यात पोलिसांना दोन दिवसांनी यश आले. विरार येथे एका मित्रासोबत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अपघातानंतर कलानगर येथून गोरेगाव, गोरेगावहून बोरिवली, तेथून शहापूर आणि नंतर विरार अशा मार्गाने मिहीर पोलिसांना चकवा देत पळत होता. वरळी पोलिस ठाण्यात मिहीरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वांद्रे येथील कलानगर परिसरातून पोलिसांनी चालक राजऋषी बिडावत; तसेच मिहीरचे वडील व शिवसेना उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये राजेश यांनीच मिहीरला पळण्याचा सल्ला दिल्याचे समोर येताच पोलिसांनी राजऋषीसह राजेश यांनाही अटक केली, मात्र मिहीर फरारी होता.

मिहीरला शोधण्यासाठी पोलिसांची ११ पथके तयार करण्यात आली होती. तो पळून जाऊ नये यासाठी ‘लूक आउट’ नोटीसही जारी करण्यात आली होती. मर्सिडीज कार, सीसीटीव्ही फूटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तो शहापूर येथे असल्याचे कळले. मात्र, पोलिस पोहचण्याआधीच पालघर येथून आलेल्या मित्रासोबत मिहीर तिथून निघाला. पोलिसांनी मिहीर आणि या मित्राच्या मोबाइलवर नजर ठेवली होती. मंगळवारी सकाळी मिहीरच्या मित्राने १५ मिनिटांसाठी मोबाइल सुरू केला आणि त्या लोकेशनवरून पोलिसांचे पथक विरार येथे पोहोचले. विरार फाटा परिसरातून पोलिसांनी मिहीरच्या मुसक्या आवळल्या. आज, बुधवारी मिहीरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Worli Hit And Run: तब्बल ६० तास शोध, मात्र ‘त्या’ १५ मिनिटांत बाजी पलटली, मिहीर शाह पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
दरम्यान, घटनेची माहिती घेण्यासाठी मंगळवारीही राजकीय नेत्यांनी वरळी पोलिस ठाण्यात भेटी दिल्या. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार रवींद्र धंगेकर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

शहापूरच्या रिसॉर्टमध्ये अख्खे कुटुंब

गोरेगाव येथील मैत्रिणीच्या घरी दोन तास झोप काढल्यानंतर मिहीर निघत होता. त्यावेळी मैत्रिणीने मिहीरच्या आईला फोन करून तो आपल्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर मिहीरची आई मीना आणि बहीण त्याच्या एका मित्राला घेऊन मर्सिडीजने गोरेगावला आले. मिहीरला घेऊन बोरिवली आणि तिथून शहापूर येथील एका रिसॅार्टमध्ये गेले. मर्सिडीजच्या क्रमांकावरून पोलिसांनी शहा कुटुंबीयांचा माग काढून शहापूर गाठले. पोलिस पोहचण्याआधीच मिहीर रिसॉर्टमधून बाहेर पडला होता. पोलिसांनी आई मीना, बहिणी पूजा आणि किंजल; तसेच मित्र अवदीप यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर या सर्वांवर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

जुहूचा तो बार सील

मिहीर शहा आणि त्याच्या मित्रांनी जुहू येथील ‘व्हाइस ग्लोबल तापस’ या बारमध्ये मद्यप्राशन केल्याचे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच, सुनावणी होईपर्यंत बारमध्ये दारू विक्री आणि खरेदीचे व्यवहार करू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. कोणतीही परवानगी न घेता बारमध्ये अंतर्गत बांधकामात फेरफार करण्यात आले होते. परवानगीपेक्षा अधिक दारूसाठा बारमध्ये होता. वेळेच्या बंधनाचे उल्लंघन; तसेच २५ वर्षांखालील असतानाही मिहीरला ‘हार्ड ड्रिंक’ देण्यात आले. असे अनेक नियम मोडल्याने हा बार सील करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्याने दिले.