Mihir Shah Arrest:  वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, अपघातानंतर ४८ तासांनी शहापूर येथून केली अटक

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिहीर याला शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे वरळी येथील ऍट्रिया मॉलसमोर मिहीर शहाने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्यांची पती प्रदीप नाखवा जखमी झाले होते. अपघातानंतर मिहीर पसार झाला होता.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मिहीर शाह याला अटक करत असताना त्याची आई आणि बहिण यांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण झाल्यानंतर मिहीरला पळून जाण्यासाठी १२ जणांनी मदत केल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी या १२ जणांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यात मिहीरचे वडील राजेश शाह आणि राजू ऋषी सिंह या दोघांचा समावेश होता. हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर वडील राजेश यांनीच मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. मिहीरला अटक झाल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पहावे लागणार आहे. हा अपघात झाला तेव्हा नेमके काय घडले होते तसेच त्याला पळून जाण्यात कोणी मदत केली होती हे गोष्टी चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.

अपघातावेळी मिहीरने मद्यपान केले होते का हा देखील मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात नेले जाईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

रविवारी पहाटे झालेल्या या घटनेनंतर मिहीर पसार झाला होता. त्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर मोबाईल बंद केला होता. त्यानंतर तो आई आणि बहिणीसह गायब झाला. त्यांच्या घराला देखील कुलूप होते. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय आरोप देखील करण्यात आले होते. कारण मिहीरचे वडील हे शिवसेनेचे नेते होते. त्यावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याची चर्चा झाल्याचे पहायला मिळाले होते.