प्रदीप नाखवा सांगतात, आम्ही रविवारी सकाळी क्रॉफर्ड मार्केटमधून मासे खरेदी करून पहाटे साडेपाचच्या सुमारास दुचाकीवरुन परतत होतो. यावेळी कावेरी गाडी चालवत होती. प्रती तास ३० ते ३५ किलोमीटर वेगानेच आमची गाडी धावत होती. पण इतक्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. यामध्ये आम्ही कारच्या बोनेटवर पडलो. ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि मी खाली पडलो, पण माझी पत्नी पुढच्या चाकाखाली अडकली.
‘मी कारच्या बोनेटला धक्का देऊन कारला थांबवण्याचा प्रयत्न केला पण परंतु चालक काही थांबला नाही. त्याने कार वेगात पळवली आणि माझ्या पत्नीला वरळी सी लिंकच्या दिशेने कारच्या चाकाखाली फरफटत नेलं. मी कारच्या मागे धावलो आणि चालकाला कार थांबवण्यासाठी विनवण्याही केल्या, पण तो काही थांबला नाही. जर त्याने तेव्हा कार थांबवली असती तर माझी पत्नी वाचली असती.’ घटनेचे थरारक कथन करताना प्रदीप नाखवांनी टाहो फोडला.
नाखवा हतबल होत म्हणतात, ‘माझी पत्नी तर आम्हाला सोडून गेली आहे. मला दोन मुलं आहेत, आम्ही आमचं सर्वस्व गमावलं आहे. तर ‘कारचा मालक २४ वर्षीय तरुण होता आणि तोच कार चालवत होता. तर त्याच्या बाजूला दुसरा व्यक्ती देखील बसला होता, आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’ असे देखील नाखवांनी सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी देखील सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याच्यामुळेच कावेरी नाखवांचा मृत्यू झाला असा ठपका ठेवला आहे. तर कार चालवताना मिहीर हा दारुच्या नशेत होता आणि अपघात घडताच त्याने तेथून पळ काढला आहे, असा देखील पोलिसांचा संशय आहे. मुंबई पोलीस त्यादिशेने पुढील तपास करत आहे.