क्रिकेट खेळून दमून झोपला, पुण्याचा २१ वर्षीय कार्तिक उठलाच नाही, चटका लावणाऱ्या मृत्यूमागे कारण काय?

पुणे : धावपळीच्या युगामध्ये माणसाचं जीवन जगणं अवघड झालं आहे. कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही? अशीच एक हृदयद्रावक घटना आंबेगाव तालुक्यातून समोर आली आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळून आल्यानंतर एक तरुण घरात येऊन झोपला. दुपारी आई उठवायला गेली असता झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.कार्तिक विष्णू विधाटे (वय २१) असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ही घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी ७ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत अक्षय शिवाजी विधाटे यांनी पारगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
MLC Elections : ठाकरे गटाची काँग्रेससोबत बैठक, नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव, भाजपही सावध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हा पुण्यातील भोसरी परिसरामध्ये कामाला होता. दोन दिवसांपूर्वीच तो कामानिमित्त गावी आला होता. रविवारी तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला. क्रिकेट खेळताना त्याला खूप दम लागला होता. त्यानंतर तो दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. अर्ध्या तासानंतर कार्तिकची आई अलका विधाटे या कार्तिकला उठवायला त्याच्या खोलीकडे गेल्या. मात्र, तो उठलाच नाही. घरच्यांना संशय आल्यानंतर त्यांनी कार्तिक याला रुग्णवाहिकेतून पारगाव येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर मंत्रातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. याबाबत पारगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कार्तिक हा विधाटे दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता. तरुण वयातच अचानक आपला मुलगा आपल्याला सोडून गेल्याने विधाटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कार्तिकेच्या घरामध्ये आई, वडील, आजी आणि आजोबा असा परिवार आहे. त्याच्या जाण्याने विधाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.