पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेटपर्यंतची मेट्रो सेवा लवकरच होणार सुरु; मुरलीधर मोहोळ यांचे शुभसंकेत

प्रतिनिधी, पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) ते स्वारगेट हा ३.६ किलोमीटर मेट्रोचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन भुयारी मेट्रो स्थानके सुरू केली जातील. त्यानंतर तिसरे मेट्रो स्थानक सुरू केले जाईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावित कामांबाबत मोहोळ यांनी सोमवारी मेट्रोच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, ‘महामेट्रो’चे संचालक अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि स्वारगेट ते कात्रज हे तीन हजार ७५६ कोटींचे प्रस्तावित मार्ग मंजुरीसाठी आहेत. त्यापैकी स्वारगेट ते कात्रज हा मार्ग कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीसाठी आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली; तसेच या बैठकीतदेखील नवीन मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर ) तयार करताना त्यामध्येच फिडरसाठी बसची तरतूद करण्याचा मुद्दा चर्चेला आला. येत्या काळात मेट्रोचे जाळे विस्तारून शेवटच्या व्यक्तीला त्याचा कसा लाभ कसा मिळेल यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.’
Pune News : पर्वतीत आघाडीत गोंधळ, तर महायुतीत स्वकीयांकडूनच आव्हान; विधानसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी वाढली
फिडरसाठी बसचे नियोजन सर्वांनी मिळून करावे

‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्या वेळी लोकसंख्येनुसार पीएमपीला १७०० ते १८०० बसची आणखी गरज आहे. येत्या काही दिवसांमध्ये ७७७ बस येणार आहेत. त्यापैकी ४०० बसची निविदा उघडण्यात आली आहे. तर, १०० बसची निविदा प्रसिद्ध केली आहे. लवकरच या बस पीएमपीच्या ताफ्यात येतील. मेट्रोच्या फिडरसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापलिका, ‘महामेट्रो’ या सर्वांनी मिळून नियोजन करण्याची गरज आहे. पुढच्या काळात बसची संख्या वाढविणे, फिडरसाठी बस कशा वाढविता येईल. जास्तीत जास्त काम कसे करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असतो. त्यामुळे चांदणी चौक ते हिंजवडी असा मेट्रो मार्गाचा विचार करण्याची सूचना केली आहे. हा मार्गामुळे मोठा दिलासा मिळणार आहे; तसेच मेट्रोचे ‘पुणे एक कार्ड’ पीएमपीसोबत इंटिग्रेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मेट्रो व पीएमपीतून एकाच कार्डवर प्रवास करणे शक्य होणार आहे.– मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय नागरी विमान वाहतूक