उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नागरिकांकडून गावी अथवा पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यातील नियमित गाड्यांचे आरक्षण तीन महिने अगोदरच ‘फुल’ झालेले असते. यंदा तर उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका, गावी जाणारे नागरिक, पर्यटनासाठी जाणारे यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून कमी गर्दी करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक विशेष गाड्या सोडल्या होत्या. या गाड्यांना प्रचंड प्रवाशांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
उपन्नात तिप्पट वाढ
पुणे रेल्वे विभागात २०२२-२३ या वर्षात ५७ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून रेल्वे प्रशासनाला सात कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी विशेष गाड्यांची संख्या १३२ होती. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली. याद्वारे रेल्वे प्रशासनाला २१ कोटी ८७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजेच यंदा १४ कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.
उत्तरेकडे सर्वाधिक विशेष गाड्या
उन्हाळी सुट्टीमध्ये पुण्यातून उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसून आले होते. काही गाड्यांचे ‘वेटिंग’ सात ते आठ हजारांच्या पुढे होते. त्यामुळे दानापूर, गोरखपूर, अजमेर, अयोध्या, झाशी, हुबळी या मार्गांवर सर्वाधिक गाड्या सोडण्यात आल्या होत्या. नागपूर, गुवाहाटी, गोंदिया या मार्गांवरही विशेष गाड्या सोडल्या होत्या. उन्हाळ्यात मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना विशेष गाड्यांचा फायदा झाला.
उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळे नागरिकांकडून गावी जाणे अथवा फिरायला जाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे रेल्वे गाड्यांना गर्दी असते. प्रवाशांची मागणी पाहता त्यांच्या सोईसाठी यंदा एप्रिल व मे महिन्यांत १३२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यात रेल्वे प्रशासनाला सुमारे २२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. प्रवाशांची सोयदेखील झाली.- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग
ठळक मुद्दे
२०२३-२४ मध्ये सोडलेल्या उन्हाळी विशेष गाड्या : १३२
२०२३-२४ मध्ये उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या : २६४
२०२३-२४ मध्ये उन्हाळी विशेष गाड्यांमधून मिळालेले उत्पन्न : ~२१ कोटी ८७ लाख