लाकडी फळीवर खिन्न चेहऱ्याने बसलेल्या
फुटपाथवर राहणाऱ्या एका सत्तर वर्षीय आजी पावसाच्या पाण्यामुळे एका लाकडी फळीवर बसून रडताना पाहायला मिळत आहेत. या पावसाच्या पाण्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. मुंबईतील पावसामुळे झालेले वास्तव या फोटोतून समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आजी या भागामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यंदाच्या पावसाने आजींचा संसार उघड्यावर पडला आहे.
मुंबईतील धक्कादायक वास्तव
आता पुढे काय करायचे या विवंचनेत या आजी मांडीवर डोकं ठेवून रडताना पाहायला मिळत आहेत. मुंबईतील धक्कादायक वास्तव दर्शविणारा हा फोटो बरंच काही सांगून जाणारा आहे. राजकीय मंडळी आम्ही खूप कामे केली, आम्ही खूप विकास केला, अशा बड्या बाता मारत असतात, मात्र पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक परिसरामध्ये रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने चालवणे देखील अवघड झाले आहे. अनेक शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
मितेश मोमाया नामक एका सुज्ञ जाणकार मुंबईकराने हा मुंबईचे वास्तव दर्शवणारा फोटो आपल्या कॅमेरात कैद केला आहे. या फोटोतून वास्तविकता समोर येत आहे.
मुंबईची दाणादाण
दरम्यान, मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सकाळीच पावसामुळे विस्कळीत झाली होती. परिणामी दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा सध्या धीम्या गतीने सुरु आहे.