मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली की सालाबादप्रमाणे पाणी साचणे हे अटळ आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिरसरात रात्रीपासून पाऊस बरसत असल्याने दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात जेबी नगर, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, असल्फा, साकीनाका, चकाला, अंधेरी या परिसरातीाल सखल भागांत पाणी साचले आहे. यासोबतच रेल्वे रुळ देखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा ठप्प झाली आहे. परिणामी पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकर नोकरदार वर्गाची चांगलीच कोंडी झाली आहे. सकाळच्या घाईच्या वेळेत लोकलसेवा ठप्प झाल्याने कार्यालयस्थळ गाठण्यासाठी मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर साचलेल्या पाण्यातून वाट काढणे मुंबईकरांची डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर नोकरदार वर्गाला सुद्धा घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.