Maharashtra Monsoon Session: पुन्हा घोषणांचा पाऊस? अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण निर्णयांची शक्यता

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील कामकाजास आज, सोमवारपासून (आठ जुलै) सुरुवात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक या अखेरच्या आठवड्यात आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून अखेरच्या आठवड्यातही घोषणांची बरसात होण्याची शक्यता आहे. पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना नव्या घोषणा केल्या जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय या अंतिम आठवड्यात येत्या १२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेची निवडणुकीकडेही लक्ष असेल.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाला २७ जूनपासून सुरुवात झाली होती. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील कामकाजास आज, सोमवारपासून सुरुवात होणार आहे. रविवारी वरळी येथे झालेल्या अपघाताचे पडसाद आज, सोमवारी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. पुण्यातील पोर्श अपघातानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते. आता वरळी येथील अपघातामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना, विशेषत: शिवसेनेला लक्ष्य करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे.

पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. त्यामुळे घोषणांचा हा वर्षाव अखेरच्या आठवड्यातही सुरू राहील, अशी चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता नव्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने महायुतीच्या आमदारांच्या वाट्याला मोठे उपयुक्त निर्णय येतील, असे सांगितले जाते.
Eknath Shinde: कुणालाही पाठीशी घालणार नाही; वरळी ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
विरोधी पक्षनेत्यांवरच राहणार नजर

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधान परिषदेतील सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले होते. दुसऱ्या आठवड्यातील अखेरच्या दिवशी त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला. त्यामुळे अखेरच्या आठवड्यात सभागृहातील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. विधानसभेतही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याआधीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे अंतिम आठवड्याच्या प्रस्तावानिमित्त ते राज्य सरकारला कसे घेरतात, हेही महत्त्वाचे आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीने सांगता

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता १२ जुलैला होणार आहे. याच दिवशी विधान परिषदेची ११ जागांसाठी निवडणूकही होणार असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कोटा पूर्ण करण्यासाठी घोडेबाजार होण्याची दाट शक्यता असल्याने नेमकी कोणत्या पक्षाची मते फुटतात, याबाबत राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.