सर्वसाधारणपणे मुंबईत होळीनंतर तापमानात वाढ होत जाते. यंदा फेब्रुवारीपासूनच सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून मुंबई, ठाण्यासह राज्यात उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील आठवड्यात शनिवार ते सोमवार या तीन दिवसांत मुंबईतील तापमान ३९ अंश सेल्सिअस पार गेले. तर ठाण्यात ४२ अंश सेल्सिअस पार गेल्याने नागरिक उन्हाने होरपळून गेले. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ लागला आहे.
मुंबईत वाढणारे प्रदूषण, तापमान यामागील कारणे आणि कुठल्या भागात तापमानात अधिक वाढ होते, याचा शोध घेतला जात आहे. पालिकेने शोधलेल्या मुंबईतील जागांच्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासह प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी जाहीर केलेल्या नियमावलीचाही आधार या कामी घेतला जाणार आहे.
मुंबईत विशेषतः उद्योग, बांधकामे सुरू असलेल्या भागात उष्णता सर्वाधिक असल्याचा अंदाज पालिकेने अभ्यासाअंती केला आहे. शिवाय बेकरी व्यवसाय असणारे भाग, लोखंडी कामे होणारे परिसर, स्टील व्यवसाय आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणारे, उष्णता असणारे भाग शोधले जातील. या भागातील उष्णता कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. उद्योग-व्यवसायातील कामांमधून कमीत कमी उष्णता निर्माण होईल, यासाठी उपाययोजना सुचवण्यात येतील. मोठ्या प्रमाणात वाहने असणाऱ्या ठिकाणी, सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी स्प्रिंकलर, प्रदूषण दूर करणारी यंत्रणा बसवण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील प्रयोगानंतर शहर आणि उपनगरातील इतर भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या प्रयोगासाठी तज्ज्ञांकडून आणखी अभ्यास सुरू असल्याची माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
या भागात अधिक तापमान
ठाणे-मुलुंड टोला नाका
भक्ती पार्क, शिवडी चेंबूर रोड
माहुल ट्राॅम्बे इंडस्ट्रीयल परिसर
गणेश नगर, कांदिवली
उपाययोजना
अधिकाधिक झाडांची लागवड
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण
स्प्रिंकलर व इतर उपकरणे
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर