मंगळवारच्या संध्याकाळपासून क्रिकेट चाहते मरीन ड्राईव्ह परिसरात जमले. खेळाडूंना घेऊन येणारी बस उशिरा आल्यानं क्रिकेट चाहते ताटकळले. गर्दी वाढत गेली. मरीन ड्राईव्ह परिसरात जवळपास ३ लाख चाहते हजर होते. या व्हिक्टरी परेडचा फटका स्थानिकांना बसला. अनेक जण घरातच अडकून पडले. त्यांना बाहेर जाता आलं नाही. तर या परिसरात राहणाऱ्या अनेकांना घर गाठताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
लाडक्या, आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी खेळाडू झाडांवर, दुभाजकांवर, इमारतीच्या संरक्षक भिंतींवर चढले. अनेक लहान मुलं, वृद्ध पोलिसांच्या कारच्या छतावरही जाऊन बसले. काही जण परिसरात उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर, छतावर चढले. व्हिक्टरी परेडच्या कालावधीत घडलेल्या घटनांबद्दल मरीन ड्राईव्ह सिटिझन्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली.
‘सुदैवानं त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तेव्हा चेंगराचेंगरी घडण्याची शक्यता होती. परिसरात प्रचंड गर्दी होती. त्यावेळी स्थानिकांपैकी कोणाला आपत्कालीन वैद्यकीय मदत लागली नाही. त्यामुळे आम्ही सुदैवी ठरलो. तशी काही मदत लागली असती तर बाहेर पडायला जागाच नव्हती,’ असं गुप्ता यांनी सांगितलं. ते मिडडेशी बोलत होते
टीम इंडियासाठी बीसीसीआयनं व्हिक्टरी परेडचं आयोजन केलं होतं. एनसीपीए ते वानखेडे स्टेडियम असा मार्गक्रम होता. या मिरवणुकीचं आयोजन करताना बीसीसीआय किंवा मुंबई पोलिसांनी एखादी संयुक्त बैठक बोलावली होती का, असा सवाल गुप्तांनी विचारला. ‘लोकांचं आयुष्य पणाला लावून कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये. आम्हाला बीसीसीआय किंवा मुंबई पोलिसांनी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. आम्हाला याबद्दल माध्यमांकडून समजलं,’ असं गुप्ता म्हणाले.
स्थानिकांना विश्वासात न घेता अशा कार्यक्रमांचं आयोजन भविष्यात होऊ नये यासाठी आम्ही याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. ‘परेड दरम्यान स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गर्दी रहिवासी इमारतींच्या परिसरात घुसली. त्यामुळे वाहनांचं नुकसान झालं. क्रिकेट चाहते खेळाडूंना पाहण्यासाठी कारवर चढले. आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर अशी वेळ आली नसती,’ असं गुप्ता म्हणाले.