भुशी डॅममध्ये पुन्हा एक दुर्घटना; कामानिमित्त जात असताना व्यक्ती बुडाला, पोलिसांकडून शोध सुरु

पुणे : भुशी डॅमजवळ कुटुंब वाहून गेल्याची घटना ताजी असताना मावळ तालुक्यातून पुन्हा एक घटना समोर आली आहे. कार्ला – मळवली रस्त्यावरील मुख्य पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी नागरिकांना पर्यायी पुलाचा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात त्या पुलावरून पाणी जात आहे. आज सकाळच्या सुमारास या पुलावरून एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कामानिमित्त तो व्यक्ती पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहत तो वाहून गेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भीमा सखाराम पवार असे वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव असून तो कार्ला येथील राहणारा आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कार्ला ते मळवली पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अतिशय धिम्या गतीने हे काम सुरु आहे. जो पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून देखील पाणी वाहत आहे. संततधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यात एक ५५ वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे. याबाबत एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने त्या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरू आहे.
शिंदेसेनेमुळे गणितं बिघडली, ठाकरेसेनेत जाणार भाजपचे पदाधिकारी; डॅमेज कंट्रोलसाठी धावाधाव

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर ही घटना घडली नसती. मात्र पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्याने पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आजची घडलेली घटना हे त्यातच प्रतीत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर; तसेच वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, स्मारक; तसेच पर्यटनस्थळ आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.