अंधेरीतील गोखले आणि बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीवरून मुंबई महापालिका टीकेचे धनी झाली आहे. गोखले पुलाचा भाग जुलै २०१८ मध्ये कोसळल्यानंतर या पुलाची पुनर्बांधणी महापालिकेने केली. मात्र, रेल्वे हद्दीतील नवीन पुलांचे काम करताना त्याची उंची दोन मीटरने वाढविण्यात आली. त्याचवेळी गोखले पुलाला जोडणाऱ्या बर्फीवाला पुलाला या उंचीमुळे जोड देता आली नाही. परिणामी महापालिकेवर टीकेची झोड उठली.
हलक्या वाहनांसाठी पूल खुला
व्हीजेटीआय, आयआटी संस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर बर्फीवाला पूलजोडणीचे काम सुरू झाले. हे काम ७८ दिवसांत पूर्ण करण्यात आले. या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि सुरक्षित असल्याचे व्हीजेटीआयमार्फत घोषित करण्यात आल्यानंतर गुरुवारपासून हलक्या वाहनांसाठी पूल खुला करण्यात आला. येथे सिग्नल बसवण्यात आला असून, वाहतूक पोलीस आणि वॉर्डनही तैनात करण्यात आले आहेत.
गोखले उड्डाणपुलाचे पूर्व ते पश्चिम आणि त्यापुढे बर्फीवालापुलाचेही पूर्व ते पश्चिम काम बाकी आहे. ही सर्व कामे मार्च २०२५पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
विलंब का?
दुसऱ्या टप्प्यातील तुळई बसवणे, पुलाचे पोहोच रस्ते करण्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करून डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार होती. मात्र, तुळई मुंबईत येण्यास विलंब होणार असून, त्यामुळे पुलाला ती बसवण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले जाईल. त्यानंतर अन्य कामही पूर्ण होण्यासाठी मार्च २०२५ उजाडणार आहे.