नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) ‘एल-३’ या रेस्टोबारमध्ये दोन तरुणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत पब, हॉटेलवर बुलडोझर फिरविण्याचा आदेश यंत्रणांना दिला होता. त्यानंतर ‘पीएमआरडीए’ने मुळशी तालुक्यातील भूगाव आणि भुकूम येथील अनधिकृत हॉटेलवर कारवाई करून ३१ हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त केल्याचा दावा केला होता. ही कारवाई २५ जूनला झाली होती. मात्र, त्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासूनच हे हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस आणि पीएमआरडीए प्रशासनाचा त्याकडे काणाडोळा होत आहे, असे दिसून येते.
येथील हॉटेलमध्ये मद्यविक्री केली जाते. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. हुक्क्यावर बंदी असतानाही ते सर्रास चालते, असे यापूर्वीचे चित्र होते. त्यामुळे या भागात मद्यपींचा धांगडधिंगा होत असे. या गोष्टींचा मनस्ताप स्थानिक नागरिक सहन करावा लागत होता.
‘पीएमआरडीए’कडून कारवाईचा दिखावा
‘पीएमआरडीए’ने केलेली कारवाईच प्रत्यक्ष जुजबी होती, अशी तक्रार स्थानिक नागरिक करतात. कारवाईत केवळ पत्र्याचे शेड आणि संरक्षक भिंती पाडण्यात आल्या होत्या. त्यात हॉटेलच्या मूळ बांधकामाला किंचितही धक्का न लावता पाडकाम करण्याची ‘विशेष कामगिरी’ ‘पीएमआरडीए’ने केली होती. याबाबत तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांनी कारवाई अद्याप सुरू असल्याचे सांगितले होते. आता हॉटेल पुन्हा सुरू झाल्याने ‘पीएमआरडीए’ची कारवाई म्हणजे दिखावा होता, अशी टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाचाही काणाडोळा?
उत्पादन शुल्क विभागाकडून रेस्टोबारचे तपासणी केले जाणार आहे. ‘पीएमआरडीए’ने कारवाई केलेल्या अनधिकृत हॉटेलमध्ये सर्रास मद्यविक्री केली जाते. या हॉटेलना मद्यविक्रीचा परवाना आहे का, परवाना असल्यास अनधिकृत हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाने परवाना कसा दिला, उत्पादन शुल्क विभाग याबाबत आता काय निर्णय घेणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.