धोतराच्या पायघड्या टाकून पालखीचे केले जाते स्वागत-
बारामतीचा मुक्काम आटोपल्यानंतर पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होऊन तुकोबारायांची पालखी काटेवाडीमध्ये जाऊन विश्रांती घेते. काटेवाडी देशाचा आणि राज्याचे लक्ष असलेले एक गाव आहे तसेच पर्यावरण संतुलित या गावाने एकात्मतेचा झेंडा देखील राज्यात रोवला आहे.
ननवरे कुटुंबाकडे असतो पायघड्यांचा मान
धोतराच्या पायघड्या एकमेकांपुढे टाकत पालखी इंदापूर बारामती रस्त्यावरून गावात वाजत, गाजत नेली जाते. या पायघड्यांचा मान मात्र ननवरे कुटुंबाकडे असतो. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा काटेवाडीत रुजली आहे. वारी चैतन्याचा सोहळा असतो. या गावात कुणी मोठा किंवा कुणी छोटा नसतो. साहजिकच धोतरांच्या पायघड्यांचा मान असलेले ननवरे कुटुंब या निमित्ताने गावातील चर्चेचा विषय असतो. या पायघड्या बनवण्याची प्रक्रिया आषाढीवारी होण्यापूर्वीच सुरू असते. तेव्हापासून ती वर्षानुवर्ष सुरूच आहे.
मागच्या वर्षी अजित पवारांनी पालखी रथाचे केले होते सारथ्य
मागच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या वेशीवर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करत रथाचे सारथ्य केले होते. अशातच यंदा शरद पवारांनी यावर्षी आपण वारीच्या स्वागतासाठी सहभागी होऊ असं सांगितले आहे. त्यामुळे यंदाची पालखीची विश्रांती ही या अर्थाने आगळी-वेगळी असणार आहे.