प्रतिनिधी, मुंबई : गणरायाच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ४ जूलैपासून खुले होणार आहे. समूह आणि वैयक्तिक आरक्षणासह परतीचे आरक्षणही प्रवाशांना गुरुवारपासून करता येणार आहे.कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठीचे नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर येथून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसातही आता लोकल वेगाने धावणार, मुंबई रेल्वेच्या ‘या’ वॉटरप्रूफ उपायाचं सर्वत्र कौतुक
६० दिवस आधी आरक्षणाची मुभा
कोकणात गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांमध्ये संपूर्ण एसटीचे आरक्षण करण्याची पद्धत आहे. यामुळे वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षण एकाच दिवशी प्रवाशांना करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाइल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
गणेशोत्सव, दिवाळी अशा सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी गाड्यांचे आरक्षण ६० दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ३० दिवस आधी गाड्यांचे आरक्षण करण्याची मुभा होती. रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवसआधी करता येते. उत्सवकाळातील गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आरक्षण करूनच सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.