Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर आणि प्रविण दरेकर यांची गळाभेट,  विधीमंडळाच्या ‘लॉबी’मध्ये   ‘लॉबिंग’ची चर्चा

Milind Narvekar meets Pravin Darekar, मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या प्रत्यक्ष राजकीय इनिंगला सुरूवात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. सुरूवातीला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. पण थोड्याच वेळात ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यासोबत विधीमंडळाच्या लॉबीमध्ये चर्चा करताना दिसले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

येत्या ११ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात महाविकास आघाडीकडील एकूण संख्याबळानुसार फक्त दोन उमेदवार निवडून येऊ शकतात.त्यांना तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर आणखी पाच ते सहा मते आवश्यक आहेत. मविआने तिसऱ्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना उतरविल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे अटळ झाले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत लॉबिंग करणे गरजचे आहे. त्याचा एक भाग म्हणून लगेच नार्वेकर आपल्या आवडत्या कामाला लागल्याची चर्चा आहे. त्यांनी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये प्रविण दरेकरांसोबत गळ्यात हात टाकून चर्चा केली. त्यामुळे लॉबीमध्ये लॉबिंग सुरू असल्याची चर्चा विधीमंडळाच्या परिसरात झडत होती.

मिलिंद नार्वेकर आणि प्रविण दरेकर यांच्यात काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे. पण नार्वेकर यांनी प्रविण दरेकरांची भेट घेतल्याचा व्हिडिओ कोणी तरी शूट केला आणि तो सोशल माध्यमांमध्ये खूपच व्हायरल होऊ लागला आहे. त्यानंतर नार्वेकर यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यामुळे आपल्या पाच सहा मतांचा ‘जुगाड’ तर करत नाही ना अशी चर्चा जोर धरू लागली आहे. नार्वेकरांच्या या गाठीभेटीमुळे मविआला धक्का बसणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे.
MLC Election: परिषदेच्या जागा ११, उमेदवार १२; मतदान होणार, कोणाचे बारा वाजणार? कोणाकडे किती संख्याबळ?
या व्हिडिओमध्ये अनेक वर्षांचे जीवलग मित्र भेटल्यावर जसे गळ्यात गळे टाकून बोलतात, तसेच दरेकर आणि नार्वेकर दिसत आहेत. दरम्यान, दरेकरांच्या भेटीनंतर चॅनलच्या कॅमेऱ्यांसमोर मिलिंद नार्वेकर यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांची भेट घेतली हा सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाठीभेटीमुळे मविआची तिसरी जागा कोणाच्या मदतीने निवडून येईल याची चाचपणी नार्वेकर करत आहे का एक झलक त्यांनी दरेकर आणि शेलार यांच्या भेटीमुळे दाखवून दिली आहे.

नार्वेकरांनंतर शेकापच्या जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आता निवडणूक रिंगणात १२ उमेदवार आले आहेत.
Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांनी ऍडव्हान्स अभिनंदन केलेल्या परबांची बाजी; ठाकरेंनी ‘ती’ चूक टाळली

कोण आहेत उमेदवार

भाजप

पंकजा मुंडे
योगेश टीळेकर
डॉ. परिणय फुके
अमित गोरखे
सदाभाऊ खोत

शिवसेना (शिंदे गट)

भावना गवळी
कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस

प्रज्ञा सातव

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मिलिंद नार्वेकर

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)

जयंत पाटील, शेकाप (पाठिंबा)