विधिमंडळाच्या लॉबीत कोणे एकेकाळचे मित्र आणि आताच्या विरोधकांमध्ये हलका फुलका संवाद रंगल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आपल्या कार्यालयातून बाहेर आले आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले.
काय झाला संवाद?
नमस्कार, काय चाललं आहे? असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच, मी लिफ्टमध्ये चाललोय असं आदित्य ठाकरेंनी मिश्किलपणे म्हटलं. त्यानंतर दोघं एकमेकांकडे पाहून जोरात हसले. मग काही चर्चा करत स्मितहास्य करुन दोघेही निघून गेले. त्यावेळी प्रसाद लाडही तिथे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे-फडणवीस भेट
भाजप आणि शिवसेना वेगळे झाल्यापासून एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात, २७ जून रोजी विधानभवनात एकत्र दिसून आले. विधानभवनाच्या लिफ्टसमोर त्यांची भेट झाली होती. लिफ्टमधून एकत्र चर्चा करत ते सभागृहात गेले होते. या राजकीय घडामोडीची चर्चा दीर्घ काळ रंगली असतानाच आता ठाकरे पुत्र आणि फडणवीस यांची अवचित भेट घडून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुम्ही दोघे सोबत छान दिसता, असं फडणवीस आणि ठाकरेंना एकत्र पाहून लिफ्टजवळ कोणीतरी म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस लिफ्टमध्ये जात असताना ठाकरेंनी भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडे बोट दाखवत याला आधी बाहेर काढा, असं गमतीने म्हटलं. त्यावर दरेकरांनी तुमचं अजून समाधान झालं नाहीए का? तुम्ही एकत्र प्रवास करणार असाल तर मी बाहेर पडतो. तुम्ही सोबत जा, असं मजेदार उत्तर दिलं होतं.
दरम्यान, ठाकरे-फडणवीसांची होणारी भेट लक्षात घेता, दोघांमधील कटुता आता कमी होतेय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या या भेटीने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या भुवया नक्की उंचावल्या असाव्यात.