राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबई-ठाण्यात कोसळधार, पुढील ४८ तासात धो-धो बरसणार

मुंबई: जुलै महिना सुरु होताच पावसाचा जोरही वाढलेला पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरासह राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला. तसेच, हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. त्यामुळे यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्यात ही कसर भरुन निघण्याची अपेक्षा आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय, विदर्भातही काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Pune News: भुशी डॅम दुर्घटनेनंतर ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, अंगावर काटा आणणारा VIDEO
तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणीत जोरदार पाऊस असेल. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगावातही धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जुलै महिना हा पावसाचा असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात १०६ टक्क्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल.