देशभरात सरासरीपेक्षा अधिक होणाऱ्या पावसामुळे शेती, धरणक्षेत्राला दिलासा मिळू शकेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे; मात्र या अतिरिक्त पावसामुळे पूरस्थिती, दरडी कोसळण्यासारख्या घटनाही घडू शकतात याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. जुलैमध्ये देशभरात सरासरी २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.
राज्यात पावसाची प्रतीक्षा
महाराष्ट्रातील धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. दक्षिण कोकणात हा जोर अधिक असू शकेल. जुलैमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त अशू शकेल, तर पश्चिम किनारपट्टी आणि मध्य भारताचा बहुतांश भाग येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणामध्ये कमाल तापमानात जुलैमध्येही तापदायक ठरू शकेल, अशी शक्यता जुलैच्या पूर्वानुमानावरून वर्तवण्यात आली आहे.
यापूर्वीही जुलैमध्ये दिलासा
यंदाच्या जूनमधील देशातील पावसाची आकडेवारी पाहता १९०१ पासूनचा हा ३२व्या क्रमांकाचा कमी पावसाचा महिना होता. तर २००१नंतरच्या कालावधीत कमी पर्जन्यमान होण्याच्या क्रमवारीत यंदाच्या जूनचा सातवा क्रमांक होता. सन २००९मध्ये ८७.५, २०१४मध्ये ९२.१, २०१९मध्ये ११३.६ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. सन १९५०पासूनची आकडेवारी पाहता २०१९पर्यंत २५ वर्षे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यापैकी २० वर्षांमध्ये जूनमधील पाऊस कमी झाल्यानंतरही जुलैमधील पाऊस सरासरीइतका किंवा सरासरीहून अधिक होता, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. त्यामुळे जुलैमध्ये सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता ८० टक्के असल्याचा सांख्यिकी अंदाजही त्यांनी व्यक्त केला.