विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी २ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने त्यांचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यानंतर शिंदे गटाने त्यांच्या २ उमेदवारांची नावे घोषित केली आहे. एकनाथ शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार आहेत. त्यांना यावेळी लोकसभेचे तिकीट नाकारले होते. तर कृपाल तुमाने रामटेकमधून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांनाही तिकीट नाकारले होते. त्या ठिकाणी भाजपचे राजू पारवे यांना संधी दिली होती. यावरुन ज्यांना तिकीट नाकारलं होतं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आहे. शिंदेसेनेने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचे यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत तिकीट न दिल्याने आता त्यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवी खेळी खेळली आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. रामटेक आणि यवतमाळ वाशिममध्ये या दोन्ही नेत्यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. हीच ताकद पाहता या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. आता या संधींचं हे दोन्ही नेते कसा फायदा घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.