Bhushi Dam: भुशी डॅम दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून दखल, पर्यटन स्थळांबाबत मोठा निर्णय

मुंबई: लोणावळ्यात रविवारी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील दहाजण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी पाचजणांना वाचवण्यात यश आलं आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षविहारासाठी आलेलं हे कुटुंब भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं. यामध्ये एका महिलेसह चार लहान मुलांचा मृत्यू झाला. याप्रकरणाची आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांच्या त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहे. पावसाळी पर्यटनात अशा घटना घडू नये, पर्यटक सुरक्षित राहावे यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पर्यटन ठिकाणी जीवन रक्षक तैनात करा, कार्डिक रुग्णवाहिका ठेवा, एसडीआरएफची टीम तैनात करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Bhushi Dam: कुटुंबासह वाहून गेली, अर्ध्यात सापडलेल्या चिमुकलीच्या हृदयाचे ठोके बंद, दोन डॉक्टरांकडून जीवनदान
इतकंच नाही तर, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही शिंदेंनी यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. मुबईतील समुद्र किनारे सुरक्षित करा, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर असून कामाला लागलं आहे.

पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या पण आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका, धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका, असं आवाहन शिंदेंनी नागरिकांना केलं आहे.

रविवारी भुशी डॅमवर काय घडलं?

पुण्यातील अन्सारी परिवारात लग्न होतं. त्यामुळे आग्र्याहून त्यांचे काही नातेवाईक लग्नासाठी आले होते. लग्नसोहळ्यानंतर त्यांनी लोणावळ्यात पावसाळी पर्यटनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे हे १०-१२ जणांचं कुटुंब लोणावळ्यात आलं. ते भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि ते पाण्यात अडकले. त्यांनी स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण एक मोठा प्रवाह आला आणि हे सगळे वाहून गेले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर एकाचा शोध सुरु आहे.