मंसुरी कुटुंबाचा मालाड पूर्वेच्या पठाणवाडी येथे एअर कंडिशनिंग (एसी) यंत्रणा पुरवण्याचा व्यवसाय आहे. ते कंपन्यांना एकगठ्ठा प्रमाणात (बल्क) एसी पुरवतात. अशीच मागणी नागपूरच्या एका कंपनीने केली होती. त्यासाठी मंसुरी कुटुंबातील चौघे त्यांच्या चालकासह नागपूरला चार चाकी वाहनाने गेले होते. संबंधित कंत्राट मिळवून, त्या आनंदात ते शुक्रवारी नागपूरहून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र जालना जिल्ह्यात एक अन्य वाहन विरुद्ध दिशेने त्यांच्यासमोर आले आणि त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाल्याने मंसुरी कुटुंबियांवर काळाने घाला घातला.
ही धडक इतकी जबर होती की, फैय्याझ शकील मन्सुरी, त्यांचा भाऊ फैझल शकील मन्सुरी व पुतण्या अल्तमेश मन्सुरी यांचा जागीच मृत्यू झाला. एसीचा व्यवसाय हा फैय्याझ व फैझल यांचे वडील शकील मंन्सुरी चालवतात. या अपघातावेळी शकीलदेखील त्यांच्यासह होते. ते या अपघतात बचावले. हे चौघे राकेश कुमार या चालकासह नागपूरला जाऊन परतत होते. चालक राकेश कुमार हा देखील मुंबईतीलच रहिवासी असून अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
संबंधितांकडून प्राप्त माहितीनुसार, शकील हे लवकरच त्यांचा व्यवसाय दोन्ही मुलांकडे सोपवणार होते. म्हणूनच या मोठ्या कंत्राटाच्या व्यवहारासाठी ते दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेले होते. मात्र त्याआधीच त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पठाणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.