महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर काही जिल्ह्यांमध्ये मोठी तूट आहे. त्यामुळे आकडेवारीवरून समाधानकारक वाटणारा पाऊस जिल्हावार आढावा घेताना दिलासादायक नसल्याची जाणीव करून देतो. कोल्हापूर जिल्ह्यात ३० टक्के, नंदुरबारमध्ये ३२ टक्के, नाशिक १२ टक्के, सातारा १० टक्के, हिंगोली ७८ टक्के, नांदेड १३ टक्के, भंडारा ५८ टक्के, गडचिरोली ४१ टक्के, गोंदिया ४७ टक्के, चंद्रपूर २२ टक्के, अमरावती १९ टक्के आणि वर्धा जिल्ह्यात ११ टक्के पावसाची तूट आहे. या तुलनेत मराठवाड्यातील धाराशीवमध्ये १०२ टक्के अतिरिक्त, आणि लातूर जिल्ह्यात ७२ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला आहे.
पावसाच्या अनुपस्थितीमुळे हा महिना देशातील अनेक भागांत उकाड्यामुळे हवालदिल करणारा ठरला. जूनमध्ये मुंबईसह अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. मुंबईतील कमाल तापमान हे ३० ते ३१ अंशांदरम्यान आहे, तर मान्सूनच्या प्रवासात निर्माण झालेल्या खंडामुळे ३६ अंशांच्याही पार तापमान मुंबईकरांनी अनुभवले. सोमवारी जुलैचा अंदाज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली.
कोकण विभागात पावसाची ओढ
कोकण विभागात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांतही अनुक्रमे ३८ आणि ३५ टक्के तूट नोंदली गेली आहे. ठाणे जिल्ह्यात १० टक्के, पालघर आठ टक्के, रायगड पाच टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन टक्के पावसाची तूट आहे. ३० जूनपर्यंत केवळ रत्नागिरीमध्ये ११ टक्के पाऊस सरासरीहून अधिक आहे.
मुंबईकरांचीही निराशा
मुंबईत शहरात १ ते ३० जूनदरम्यान कुलाबा येथे ५४२.३ मिलीमीटर पाऊस सरासरी पडतो. यंदा केवळ ३३७.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मुंबई उपनगरांमध्ये या कालावधीत ५३७.१ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा ३४६.९ मिलीमीटर पावसाचीच नोंद झाली. या कमी पावसामुळे इतर वेळी जूनमध्ये जाणवणारा पावसाळी गारवा अजूनही मुंबईकरांना पूर्णत्वाने अनुभवता आलेला नाही.
महाराष्ट्रात एक टक्का जास्त पाऊस
महाराष्ट्रात जूनमध्ये एक टक्का जास्त पाऊस पडला. सर्वसाधारणपणे जूनच्या अखेरीस राज्यात २०९.८ मिलीमीटर सरासरी पाऊस अपेक्षित असतो, मात्र यंदा २११.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात कोकण विभागात एक टक्का, मध्य महाराष्ट्रात १० टक्के आणि मराठवाड्यात १८ टक्के अधिक पाऊस, तर विदर्भात १६ टक्के तूट आहे