नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली. जनतेमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचे चित्र आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्याचमुळे लोकसभा निकालांत सत्ताधाऱ्यांना प्रचंड मोठा दणका बसला. पक्षबदल करू इच्छिणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघातील स्थानिक प्रश्न आणि राजकीय समीकरणे देखील महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपले राजकीय भविष्य धोक्यात येऊ नये, या दृष्टीने आमदारांनी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
कोणकोणत्या आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतली?
नाशिक लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीत रान पेटले होते. केंद्र सरकारविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोष होता. जनतेने मतपेटीतून तो रोष दाखवून दिला. हेच लक्षात घेऊन तेथील २ आमदार, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील २ आमदार आणि विधान परिषदेचे मराठवाड्यातील एका आमदाराने जयंत पाटील यांची भेट घेऊन पुढील बोलणी सुरु केली आहे. जयंत पाटील यांनीही आमदारांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून अधिवेशन संपताच निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.
आमदारांच्या भेटीवेळी केवळ जयंत पाटील हेच उपस्थित नव्हते तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. इच्छुक आमदारांनी ज्येष्ठ नेत्यांशी हितगूज करून निधीबद्दलची अडचण प्रकर्षाने सांगून नाईलास्तव वेगळा निर्णय घेतल्याने पुनश्च एकदा सांगितले. पण लवकरच सोबत काम करू, विधानसभेला एकदिलाने लढू, असे सांगून आमदार दालनातून बाहेर पडले.
कोणतं कार्ड कधी बाहेर काढायचं हे साहेबांना बरोबर माहिती!- रोहित पवार
आमदारांच्या भेटीवर विचारले असता आमदार रोहित पवार म्हणाले, “जयंत पाटील खूपच सिनिअर आणि अनुभवी नेते आहेत. कधी कुठलं कार्ड बाहेर काढायचे हे त्यांना चांगले माहिती आहे. शरद पवार यांच्या जोडीला जयंत पाटील साहेब आहेत, त्यामुळे कार्यक्रम फिक्स होणार आहे. ही तर सुरुवात आहे. आमच्यासोबत १० ते १५ आमदार येतील”