याला आधी बाहेर काढा! ठाकरेंचा मिश्किल टोला; फडणवीसांसोबत लिफ्ट प्रवास, दोघांमध्ये काय संवाद?

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसलेला असताना, महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभेची तयारी सुरु केलेली असताना विधिमंडळात अकल्पनीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पाटील, ठाकरे आणि सेनेच्या आमदारांमध्ये हसतखेळत चर्चा झाली. यानंतर ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजी माजी मुख्यमंत्री विधिमंडळातील लिफ्टजवळ भेटले. त्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या भेटींची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधिमंडळात पोहोचलेले उद्धव ठाकरे लिफ्टची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळलं नाही. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. दोघांमध्ये त्रोटक बोलणं झालं. यावेळी तिथे ठाकरेसेनेचे आमदार विलास पोतनीस, विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील-ठाकरे भेट; अभिनंदनानं भुवया उंचावल्या, उद्धव म्हणाले, असंच प्रेम राहू द्या!
तुम्ही दोघे सोबत छान दिसता, असं फडणवीस आणि ठाकरेंना एकत्र पाहून लिफ्टजवळचं कोणीतरी म्हटलं. त्यानंतर पुढच्या काही क्षणांत लिफ्ट आली. ठाकरे आणि फडणवीस लिफ्टमध्ये जात होते. त्यावेळी ठाकरेंनी भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडे बोट दाखवत याला आधी बाहेर काढा, असं म्हटलं. त्यावर दरेकरांनी तुमचं अजून समाधान झालं नाहीए का? तुम्ही एकत्र प्रवास करणार असाल तर मी बाहेर पडतो. तुम्ही सोबत जा, असं प्रत्युत्तर दिलं.

पाटील ठाकरेंच्या भेटीला, उद्धव म्हणाले, प्रेम असंच राहू द्या!
विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. पण अधिवेशनाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदीय कामकाज मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवेंच्या भेटीला पोहोचले. त्यावेळी तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. दोघांचा संवाद झाला. यावेळी दानवेंनी पाटील यांना पेढे दिले. लोकसभेत आमच्या ३१ जागा आल्या. त्याबद्दल हे पेढे, असं दानवे म्हणाले. दादांनी त्यांच्याकडून पेढा घेतला आणि दानवेंना चॉकलेट दिलं. त्यावर तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या, असे उद्गार ठाकरेंनी काढले.