Legislative Council elections: विधानसभेच्या आधीच मविआ सत्ताधाऱ्यांना देणार धक्का; विधान परिषद निवडणुकीत अस्वस्थ आमदारांवर डोळा

प्रतिनिधी, मुंबई

जुलै महिन्यात ११ जागांसाठी होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तिसरा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची रणनीती आघाडीतील नेत्यांनी आखल्याचे खात्रीलायक सूत्रांनी मटाला सांगितले. रिक्त जागांनुसार, महायुतीकडे ९ जागा तर महाविकास आघाडी दोन जागा निवडून आणू शकते. परंतु, मविआकडून तिसरा उमेदवार उतरवून गुप्त मतदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होणार असल्याचे कळते.

विधानपरिषदेतून ११ आमदार निवृत्त झाले असून त्यांच्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेतील आमदार निवडून आणण्यासाठी विधानसभेतील आमदार मतदान करतात. सध्या विधानसभेतील आमदारांची संख्या २७४ असून परिषदेत आमदार निवडून आणण्याचा कोटा २३ इतका आहे. भाजपचे सध्या १०५ आमदार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे ४० आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे ३८ आमदार आहेत. तर मविआतील काँग्रेसकडे ३७, शिवसेना ठाकरे गटाकडे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाकडे १० आमदार आहेत.
Maharashtra Assembly Elections: महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय; विधानसभा निवडणुकीत वंचितसाठी दारे बंद

पक्षीय बलाबलामुळे पाचवी जागा निवडून आणण्यासाठी भाजपची भिस्त अपक्षांवर आहे. तर दुसरीकडे प्रत्येक दोन जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना मविआमधील आमदार फोडावे लागणार आहेत. दुसरीकडे मविआची ताकद दोन जागांवर उमेदवार निवडून आणायची असली तरीही तिसऱ्या जागेवर उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात आल्याचे कळते.

मविआतील एका ज्येष्ठ नेत्याने मटाशी बोलताना सांगितले की, काँग्रेस एक जागा सहज निवडून आणू शकते तर दुसरी जागा काँग्रेस-राष्ट्र्वादी यांच्या पाठिंब्याने निवडून येऊ शकते. परंतु, योग्य रणनीती आखल्यास तिसरी जागाही निवडून आणणे शक्य असून त्यासाठी आघाडीने जुळवाजुळव सुरू केली आहे. विधान परिषदेचे मतदान हे गुप्त पध्दतीने होणार लोकसभा निवडणुकीनंतर अस्वस्थता पसरलेल्या राष्ट्रवादी तसेच शिवसेना पक्षातील आमदारांवर मविआच्या नेत्यांची नजर आहे.