पक्षाने त्यांच्या एक्स हँडलवर गुगल फॉर्मची ऑनलाईन लिंक पोस्ट केली आहे. यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले असून अर्जदारांना त्यांचा वैयक्तिक तपशील, त्यांच्या पसंतीचा विधानसभा मतदारसंघ आणि पक्षाने त्यांना उमेदवारी का द्यावी, याची माहिती भरण्यास सांगितले आहे. याबरोबरच फॉर्ममध्ये अर्जदारांनी समाजासाठी केलेल्या कमीत कमी पाच योगदानाची नोंद करावी लागणार आहे. तसेच लेखी अर्जही इच्छुकांना पाठविण्याची मुभा आहे.
वंचितच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्यांचे मत जाणून घेईल, असेही त्यांनी म्हटले.
आज सर्वच पक्षांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा निवडणुकीच्या फायद्यासाठी वापर केला आहे. पण, शाहूंच्या सुधारणा विशेषत: वंचितांसाठीच्या सकारात्मक कृतींना या पक्षांनी जाणून घेतले नाही. हे पक्ष वेळोवेळी सत्तेत आले पण, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेला बाधा निर्माण करत राहिले. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने आपली निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीची निवड केली. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी केवळ वंचितांचे रक्षण आणि सकारात्मक कृती राबविण्यासाठी अभियान राबवणार नाही, तर मतदारांशी सखोल संबंध निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करेल, असेही त्यांनी म्हटले.
तसेच, विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज पाठविण्यासाठी पक्षाने ऑनलाईन पर्यायांसह वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई कार्यालयात अर्ज पाठविण्याचा पर्यायही दिला आहे. ज्यांना आपल्या अर्जाची हार्डकॉपी आणि बायोडेटा पाठवायचा आहे. त्यांनी श्रीमती. रेखा ठाकूर, वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय, ठाकरसी हाऊस, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, जेएन हेरेडिया रोड, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई – 400001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकणार असल्याचे एक्सवर म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 38 जागा लढविल्या होत्या आणि १५ लाखांहून अधिक मते मिळवली होती. आता महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.