गेल्यावेळी चेंगराचेंगरीचा प्रकार, यंदा विसावा ठिकाणात बदल, गाडीतळमध्ये मुक्काम नसणार

प्रतिनिधी, हडपसर : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा गाडीतळ येथील हरपळे बिल्डिंग येथे दर वर्षी केला जात होता. मात्र, तेथे जागा कमी असल्यामुळे मागील वर्षी चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे यंदा विसाव्याची जागा हरपळे बिल्डिंगऐवजी तेथून पुढे सोलापूर रोडकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर मंडपात करण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत मान्यता ही घेतली आहे, असे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पालखी आढावा बैठकीत जाहीर केले.

हडपसर मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा विसावा हडपसरमधील गाडीतळ येथे असतो. या सोहळ्याच्या नियोजनाची बैठक हडपसर पोलिस ठाण्यात झाली. या वेळी शहर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण कळमकर, माजी नगरसेवक मारुती तुपे आदी उपस्थित होते.
‘वारी’ने जागवला खाकीतील ‘भक्तिरस’; पोलिस आयुक्तांसह अधिकाऱ्यांचाही विठुनामाचा जयघोष करीत वारीत सहभाग

भैरोबा नाला ते गाडीतळापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या हटवाव्यात, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, वारकऱ्यांना फराळाचे वाटप शिस्तबद्ध व्हावे, भाविकांचा घोळका होऊ नये यासाठी पोलिसांचे नियोजन असावे, पालिकेकडून जागोजागी फिरते स्वच्छतागृह ठेवावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.