‘तू मला किरकोळ समजतो काय,’ पिस्तूल काढून पोटाला लावले, चाप ओढला अन्…; पुण्यात मध्यरात्री थरार

प्रतिनिधी, पुणे : ‘तू मला किरकोळ समजतो काय,’ असे म्हणून व्यक्तीच्या पोटाला पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवार पेठेतील श्री सरस्वती हाइट्स येथे घडला. या प्रकरणी प्रसाद अरुण भोसले (वय ३३, रा. कसबा पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून विजय केशव घुमारे (वय ५०, रा. बुधवार पेठ) याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना २३ जूनला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

कंबरेचे पिस्तूल काढून पोटाला लावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कसबा पेठेतील सावतामाळी भ‌वनाच्या समोर राहतात. ते त्यांच्या चार ते पाच मित्रांसह बुधवार पेठेतील श्री सरस्वती हाइट्स समोरील सार्वजनिक रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. आरोपी तेथून जात असताना, तक्रारदारास खोकला आला. तक्रारदार आणि आरोपीत महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्या रागातून आरोपीने तक्रादाराला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने कंबरेचे पिस्तूल काढून तक्रारदाराच्या पोटाला लावले आणि चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यानंतर तक्रारदार आणि आरोपी तेथून निघून गेले. तक्रारदाराने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.
दादांचे आमदार परतणार माघारी? घरवापसीसाठी पवारांच्या अटी ठरल्या; ‘त्या’ ४ नेत्यांना नो एंट्री?

आरोपीने पिस्तुलाचा चाप ओढला; मात्र गोळी सुटली नाही असे तक्रारीत नमूद आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अधिक तपास केला जात आहे.
– भीमराव मांजरे, पोलिस उपनिरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे