अतिरिक्त आयुक्तांनी उगारली ‘छडी’
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतच सर्व विभागप्रमुखांची ‘शाळा’ घेऊन विकासकामांवरील निधी अखर्चित राहणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना केली. लोकसभेची आचारसंहिता संपली असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास साधारणत: अडीच महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत विकासकामांसाठी पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करणे, त्याला मंजुरी घेणे, निविदा प्रक्रिया राबवून स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी घेणे आणि त्यानंतर कार्यादेश देण्याची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा; आचारसंहितेच्या काळात ही विकासकामे करणे शक्य होणार नाही. या प्रक्रियेसाठी दोन महिनेच राहिल्याने अतिरिक्त आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे.
‘सप्टेंबरअखेर कार्यादेश काढावेत’
पावसाळापूर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याचा फटका विकासकामांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर खबरदारी घेण्यात येत असली, तरी त्यास विभागप्रमुखांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. पावसाळ्यात खोदाई करता येत नसल्याने विकासकामांवर मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या वित्तीय मान्यता घेतलेल्या सर्व तातडीच्या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरअखेर कार्यादेशही काढावेत, असे आदेशही अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची शक्यता
महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात रुजू झाले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हेदेखील नव्याने रुजू झाले. या दोघांपेक्षाही अधिक काळ अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पुणे महापालिकेत व्यतीत केला आहे. त्यामुळे त्यांची विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन आयुक्त, अतिरिक्त आयुक्त; तसेच नव्याने येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या खांद्यावर महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची धुरा असणार आहे.
संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून आवश्यक कामांचे नियोजन, त्यांची निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश याबाबतच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत.– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त.