“लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा” अशी पोस्ट शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवाराचा शोध सुरु होता.
मुंबई महापालिकेचा मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या कारणामुळे भाजपकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांचा प्रचार कसा करायचा, असा सवाल भाजपकडून विचारला जात होता.
कोण आहेत रवींद्र वायकर?
रवींद्र वायकर यांनी गेल्या महिन्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश केला. ते मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. १९९२ पासून सलग चार वेळा ते मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. २००६ ते २०१० या काळात त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं.
२००९ मध्ये रवींद्र वायकर यांनी विधानसभेत एन्ट्री केली. सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री पद मिळाले. तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपदही त्यांनी भूषवले. आता त्यांना लोकसभेच्या तिकिटाची बढती मिळाली आहे.