घटनेतील आरोपी पोलीस उपनिरीक्षक आणि पीडित महिला कॉन्स्टेबल हे दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. २०२० मध्ये दोघेही एकत्र कामावर असताना, पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण याने २६ वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबल सोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडित कॉन्स्टेबलला लग्नाचे आमिष दाखवून तिला सानपाडा सेक्टर -५ मधील राकेश निवास इमारतीतील फ्लॅटमध्ये अनेक वेळा नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गत तीन वर्षांमध्ये पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याने पीडितेकडून वेगवेगळ्या कारणाने १९ लाख रुपये सुद्धा घेतले. महिला कॉन्स्टेबलने आपली रक्कम परत मागितली असता त्यातील फक्त १४ लाख रुपये परत दिले. मात्र उर्वरित पैसे दिले नाहीत.
दरम्यानच्या काळात दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याने महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.तसेच महिला कॉन्स्टेबलने पतीला सोडून न दिल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला कॉन्स्टेबलने घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण यांच्या विरोधात बलात्कार असून विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी सानपाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. सानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.