पर्यटनाला येणं पडलं महागात, दिल्लीच्या विद्यार्थ्याचा पुण्यात मृत्यू, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातून एक धकक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर भागातून पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या सहा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्वैत सुदेश वर्मा (वय १८, रा. विमान नगर, पुणे…मूळ राहणार मयूर विहार, पूर्व दिल्ली) असं बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. हे सर्व विमाननगर येथील सिंबॉयसिस कॉलेजचे विद्यार्थी आहेत. प्रशांत शहा (वय १९), अरविंद श्रीकुमार एस (वय १८) , प्रणव नंदकुमार श्रीनिवास (वय २०), मित संजयकुमार डुगगल (वय १८) आणि सुरांक शशी प्रताप (वय १८) अशी अन्य मित्रांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रविवारी सव्वाचारच्या सुमारास पुण्यातील विमाननगर भागातून मावळ तालुक्यातील मौजे फागणे येथे सहा मित्र पर्यटणासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते पवना धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. त्यातील अद्वेत याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
Maharashtra Rain Update: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला; पुढील ५ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांनाही पाचारण केले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरूणाचा शोध सुरू करण्यात आला. अखेर रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. मृत अद्वैत वर्मा याच्या कुटुंबीयांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. पर्यटकांनी फिरायला येताना अतिउत्साह दाखवून पाण्यात उतरू नये, नको ते धाडस करू नये. अन्यथा आपला जीव गमवावा लागू शकतो, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.