मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजीसह एकूण आठ माध्यमांच्या एकूण १,१४७ शाळांमध्ये मिळून साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवले जातात. यात कौशल्य विकास केंद्र, क्रीडा संकुल, किचन गार्डन अशा काही उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याचा विचार करून महापालिकेने शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. २०२४-२५च्या अर्थसंकल्पात २०० शाळांमध्ये अशा खुल्या व्यायामशाळा उभारण्याची घोषणाही झाली होती. यासाठी राज्य शासनाच्या जिल्हा नियोजन समितीनेही मंजुरी देत आर्थिक मदतही देऊ केली.
मुलांचा विचार करून रचना
सध्या या २०० पैकी सुमारे ८० शाळांमध्ये या खुल्या व्यायामशाळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईत ठिकठिकाणी उभारलेल्या खुल्या व्यायामशाळांच्या धर्तीवरच, मात्र लहान मुलांचा विचार करून या व्यायामशाळांची आणि त्यातील उपकरणांची रचना आहे. खेळाच्या तासिकेला किंवा इतर वेळी विद्यार्थी या व्यायामशाळेत व्यायाम करू शकतील. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ते कणखर होण्यास मदत होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी व्यक्त केला.
उद्दिष्ट आधीच पूर्ण होईल
येत्या आर्थिक वर्षात २०० व्यायामशाळा उभारण्याचे उद्दिष्ट असले, तरी त्याआधीच आम्ही हे काम पूर्ण करू. आता पाऊस सुरू होणार असल्याने पावसाळ्यानंतर या सर्व व्यायामशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होतील, असेही कंकाळ म्हणाले.