पोरांचं आयुष्य धोक्यात आलंय, पेपरफुटीविरोधात अधिवेशनात आवाज उठवू : अनिल परब

म .टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान आणि सरकारी नोकर भरतीतील पेपरफुटीच्या विरोधात राज्य सरकारने गंभीर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी रविवारी केली. तर पेपर फुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी परब यांनी रविवारी केली आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष बैठक रविवारी चेंबूर येथे पार पडली. या बैठकीत अनिल परब यांनी वरील मागणी केली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनिल परब म्हणाले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पदवीधरांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वैद्यकीयची नीट, प्राध्यापकासाठीची नेट, महसूल विभागाची तलाठी, पीएचडीची सीईटी, इयत्ता १२ वी बोर्ड आदी परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पेपर फुटीमुळे परिक्षार्थींचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होत आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांसमोरचा हा ज्वलंत विषय राहिला पाहिजे. दक्षता कक्ष स्थापन करुन त्याचे संयोजन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे दिल्यास या प्रकरणांना आळा बसेल, अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.