एमएमआरडीएची उपकंपनी असलेल्या महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) गुंदवली (अंधेरी पूर्व) ते अंधेरी पश्चिम मार्गे गोरेगाव, आरे, दहिसर, एकसर, ओशिवरा अशी मेट्रो २ अ व मेट्रो ७, ही संयुक्त मार्गिका चालविली जाते. या मार्गिकेतील विविध कामांसाठी कंपनी बाहेरून मनुष्यबळ घेते. या अंतर्गत संचालन विभागातील ५०० मनुष्यबळ पुरवठ्यासाठी कंपनीने निविदा काढली होती. त्या अंतर्गत डीएस एन्टरप्राइज या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यातच घोटाळा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एमएमआरडीएतील सूत्रांनुसार, या कंपनीकडून ५०० मनुष्यबळाऐवजी १० टक्के कमी मनुष्यबळ पुरवले जात होते. मात्र त्यासाठीचा मोबदला १०० टक्के दिला जात होता. हा मोबदला देण्याचे काम मनुष्यबळ विकास विभागाकडून होत होते. याबाबत माहिती मिळताच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. या आदेशान्वये चौकशी केली असता प्राथमिक तपासात राहुल अहिरे हे अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना एमएमएमओसीएलच्या सध्याच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे.
दरमहा १०-१५ लाख रुपये अतिरिक्त
संबंधित कंत्राटदाराला ही मार्गिका सुरू झाल्यापासून (एप्रिल २०२२) दरमहा १० ते १५ लाख रुपये अतिरिक्त दिले जात होते. त्यानुसार या कंत्राटदाराला आत्तापर्यंत ३ कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच आता एमएमएमओसीएलचे संचालक (देखभाल) प्रवीण गाजरे हे पुढील चौकशी करीत आहेत. यामध्ये मनुष्यबळ विकास विभाग व वित्त विभागाची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याचे संकेत आहेत.