भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पुढील पाच दिवसांच्या अनुमानानुसार पुढच्या २४ तासांमध्ये मुंबई, पालघर आणि ठाणे येथे ४० ते ५० किमी प्रति तास असा वाऱ्याचा वेग राहणार आहे. परिणामी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान शनिवारी २२ जूनला महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागांत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तर रविवारच्या दिवशी सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान अति मुसळधार पाऊस जिल्ह्याला घेरणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी पहाटेपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते दरम्यान शहरात हलक्या पावसाने हजेरी लावली. याच धर्तीवर आता २६ तारखेपर्यंत मुंबईत पाऊस सातत्य राखणार असल्याचे सूचित केले आहे.
तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा
हवानान तज्ज्ञांनी देखील विभागाच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे. आजपासून पुढील ५ दिवसांसाठी दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याचे शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच मराठवाड्याच्या काही भागांत देखील वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
यासोबतच तज्ज्ञांनी पाऊस बरसण्या दरम्यानची स्थिती सांगितली आहे. तज्ज्ञांच्या मते, पश्चिमेकडील वारे पुन्हा जोर धरू लागले आहेत आणि पश्चिम किनारपट्टीवर एक कुंड तयार झाले आहे, ज्यामुळे कमी दाब निर्माण झाला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ही अनुकूल स्थिती आहे. जी पुढील काही दिवसांसाठी सारखी राहणार आहे.