उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर निलेश लंकेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव साहेबांनी मला सांगितले.’
अहमदनगरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक शुभारंभासाठी ‘आपण भव्य मेळाव्याचे आयोजन करणार’ असल्याचे सांगत नीलेश लंकेंनी नगरमधून १२ पैकी १२ आमदार निवडून आणण्याचे उद्धव ठाकरेंना वचन देखील दिले आहे.
आपल्या शिवसेनेतील कार्यकाळाची आठवण काढत नीलेश लंके म्हणाले, ‘बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन माझ्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख अशी सगळी पदं मी भुषविली. आता खासदार म्हणून निवडून आलो, याचा उद्धव ठाकरे यांनासुद्धा खूप आनंद झालाय.’
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर खासदार नीलेश लंकेंच्या स्वागताचे बॅनर झळकत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक अशा आशयाचे बॅनर चर्चेचा विषय ठरले. निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा असल्याने लंकेंनी शिवसैनिकांसमवेत मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली.