बारामती तालुक्यातील निंबूत हे बबई केरबा बनसोडे या आजींचं सासरचं गाव.. बारामती तालुक्यातीलच कांबळेश्वर हे त्यांचे जन्मगाव. आजी देशातील पहिल्या महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा हा बहुमान वेगळाच असला तरी, आताच्या पिढीला अनुकरणीय आणि प्रेरणादायी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे त्यांचं वाचन खूप आहे.
त्यांना पुस्तक वाचनाचा छंद जडला आहे. कधीही तुम्ही गेलात तर त्यांच्या आजूबाजूला पुस्तके पडलेली असतात आणि अर्थातच या पुस्तकांमध्ये वैचारिक दृष्ट्या असलेल्या पुस्तकांचा भरणा जास्त आणि महाराष्ट्राला, देशाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या पुरोगामी विचारसरणीच्या महापुरुषांचाही त्यांच्यावरती मोठा पगडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. नरेंद्र दाभोळकरांपासून सुधा मूर्तीपर्यंत आणि शरद पवारांपासून सिंधुताई सपकाळ पर्यंत अनेकांची चरित्र आता वाचून झाली आहेत.
सकाळी सहाला उठून आवरल्यानंतर घरासमोरच्या झोपाळ्यात दिवसभर वाचत बसायचं, हा आता त्यांचा नित्यक्रम बनला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचा हा वाचनाचा उपक्रम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखीनच भर घालतोय. आरक्षणाची कोणतीही सुविधा नसताना १९६३ मध्ये देशातील पहिल्या महिला ग्रामपंचायत सदस्य झालेल्या बबई केरबा बनसोडे यांच्या तीन पिढ्या आज त्यांच्याबरोबर आहेत. तब्येतीची कोणती तक्रार नाही आणि चष्मा तर नाहीच नाही.
सावित्रीबाईंमुळे मला थोडं तरी शिकता आलं. शाळेची पायरी चढता आली. कांबळेश्वर गाव आमचं जन्मगाव. या गावात माझ्या वेळेस फक्त तीनच पोरी शाळेत शिकल्या. माझ्या वेळेस सातवी नंतर जवळपास शाळा नव्हती. त्यामुळे शिक्षण थांबलं. आता मात्र वाचायचं काही शिल्लक ठेवायचं नाही असं मी ठरवलं असल्याचे बबई केरबा बनसोडे सांगतात.