Pune Crime : पोलिसांची डोकेदुखी वाढली, सराईत चोरट्यांकडून दिवसभरात चार घरफोड्या, लाखोंचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी, पुणे : शहरातील विविध भागांमध्ये गुरुवारी दिवसभरात घरफोडीच्या चार घटना उघडकीस आल्या असून, साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथील घरफोडीत ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी शिवसिद्धी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. राधाबाई या सांगली जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची मुलगी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांकडे गेली होती. बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्याचे दागिने चोरले.

Chhatrapati Sambhajinagar : शेलगाव शाळेला पालकांनीच ठोकले कुलूप, असं काय घडलं?
दुसरी घटना सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. संभाजी पार्क परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार मंगळवारी (१८ जून) त्यांच्या घराला कुलूप लावून पाहुण्यांकडे गेले होते. त्या वेळी चोरांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधून एक लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील काही वस्तू चोरून नेल्या.

तिसरी घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चंदननगर येथील संघर्ष चौकाजवळील २९ वर्षीय तरुणाच्या ऑफिसचे कुलूप तोडून चोरांनी एक लाख १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाइल चोरून नेला. चौथी घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. एका किराणा मालाच्या दुकानातून चोरट्यांनी रोख रकमेसह, मोबाइल आणि ‘परफ्युम’ असा सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.