प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महापालिकेने याबाबत २५ ऑक्टोबरला परिपत्रकही जारी केले. त्यानंतर, प्रत्यक्ष कारवाईला ४ नोव्हेंबर २०२३पासून सुरुवात झाली. बांधकामे आणि विकासकामांच्या ठिकाणी कारवाई करतानाच, बेकरीतील चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिकांनी केलेल्या तक्रारींनंतरही कारवाया केल्या. मात्र मुंबईतील बेकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण हीदेखील गंभीर बाब असल्याने, त्याची दखल घेऊन मुंबई महापालिकेने त्याविरोधात कारवाई करण्यासाठी नियोजन केले आहे.
पर्यावरण विभागाने आरोग्य विभागाकडून बेकऱ्यांची माहिती घेतली असता, ६०० हून अधिक बेकऱ्या मुंबईत असल्याचे समोर आले. त्यांची माहिती घेतली असता, यातील २५हून अधिक बेकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. या बेकऱ्यांमध्ये विविध खाद्यपदार्थ भाजण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. लाकडे महाग असल्याने, काही बेकऱ्यांचे मालक भंगारातील लाकडी सामान घेऊन त्याचा वापर करतात. यामुळे त्या-त्या भागात अधिकच प्रदूषण होत आहे.
मुंबईमध्ये काही बेकऱ्यांमध्ये विजेवरील भट्ट्या आहेत. ‘या प्रदूषणकारी बेकऱ्यांवर कारवाई करावी की, त्यांचे विजेवरील भट्टीमध्ये रूपांतर करण्यासाठी मुदत द्यावी, तसेच कारवाई केल्यास दंड आदी विषयांवर सध्या चाचपणी सुरू आहे, असे मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मिनेष पिंपळे यांनी सांगितले.
अन्य बेकऱ्यांवर कारवाई
मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृत बेकऱ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये लाकूड किंवा जुने टाकाऊ सामान यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लवकरच या बेकऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचे स्वरूपही निश्चित केले जाणार असून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा महापालिकेचा विचार आहे.