माझ्या मुलीचंच नाव पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळलं, अनिल परब यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या मतदारयादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी बुधवारी केला. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली ही नावे जाणून बुजून वगळल्याचा आरोप करत, यामुळे मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांच्या तत्त्वाला हरताळ फासला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; असा गंभीर आरोप यावेळी अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर केला.

अनिल परब यांचे आरोप काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने खासदार अनिल देसाई नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी देसाई यांच्या सोबत अनिल परब आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी याविषयी माहिती दिली. ‘पुरवणी मतदारयादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती, त्यातील बरीचशी नावे समाविष्ट झालेली नाहीत. त्यांनी फॉर्म स्वीकारल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. फॉर्म दिला जातो, त्याच वेळी तो तपासूनच त्याची पोचपावती दिली जाते. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर पोचपावती येते. ज्यावेळेस पोचपावती दिली जात नाही, त्यावेळी फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणेही दिली जातात. फॉर्म नाकारण्याची कारणे जाणून घेणे हा अधिकार आहे. मात्र या वेळेस फॉर्म स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. त्यामुळे यामध्ये खूप मोठी गडबड आहे,’ असे परब म्हणाले.
Gajanan Kirtikar : अमोलला सांगितलं, सरळ कोर्टात जा; स्वपक्षीय खासदार वायकरांच्या विरोधात कीर्तिकरांचा सल्ला
निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली ही नावे वगळल्याचा आरोप परब यांनी केला. ‘आम्ही नोंदवलेली नावे आली नसली, तरी सत्ताधारी पक्षाने दिलेली सर्व नावे पुरवणी मतदारयादीत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या निर्देशांखाली काम करत आहे, असे वातावरण तयार झाले आहे,’ असा आरोप परब यांनी केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

मतदानकेंद्रांचा घोळ

पदवीधर निवडणुकीसाठी मतदानकेंद्रे निश्चित करताना, राजकीय पक्षांना विश्वासात न घेताच थेट अंतिम मतदानकेंद्रांची यादी देण्यात आली. एकाच घरातील पतीस पश्चिमेकडील केंद्र, तर पत्नीस पूर्वकडील मतदानकेंद्र असा अक्षम्य घोळ यात घालण्यात आला असल्याचे परब म्हणाले.