परफॉर्मिंग आर्ट महोत्सवाचा भाग म्हणून आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात रामायणाची विटंबना करण्यात आली व प्रभू श्रीरामाबद्दलही अवमानकारक शब्द उच्चारण्यात आले होते. याबाबत संस्थेच्या आवारातील काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत हे नाटक बंद पाडले होते. तसेच संस्थेच्या प्रशासनाकडेही याबाबत तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीची दखल घेत आता आयआयटी प्रशासनाने आठ विद्यार्थ्यांना एक लाख २० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. संस्थेच्या आवारात कार्यरत असलेल्या आंबेडकर, पेरियार, फुले स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेनेही या बातमीची पुष्टी केली असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार ते एक लाख २० हजार असा दंड भरावा लागणार आहे.
३० जुलैपर्यंत मुदत
आयआयटी मुंबईच्या रजिस्ट्रार कार्यालयातून ४ जून रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत दंडाची रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. याबाबत आयआयटी मुंबईच्या प्रवक्त्या फाल्गुनी बानर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.