कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार; १० फूट खोली, दुर्गप्रेमींना कसा लागला शोध?

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा किल्ल्यावर दुर्गप्रेमींना नव्याने एक भुयार आढळून आले आहे. किल्ल्यावर खडकात खोदलेले टाके, कोठारे, वाड्याची इमारत, घरांचे जोते, शरभ शिल्प, भुयारे आदी वास्तूंचे अवशेष आढळले असताना, आता अडीच बाय दीड फूट लांबरुंद आणि साधारण १० फूट खोल असेलेले नवे भुयार सापडले आहे. गणेश रघुविर आणि मयूर टकले या दुर्गप्रेमींनी या भुयाराचा शोध लावला आहे.

कर्नाळा किल्ल्याला माथ्यावर असलेला सुळका हा या किल्ल्याचे वैशिष्ट्य असून, मुंबई-गोवा महामार्गावरून तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे किल्ल्याच्या परिसरातील जंगल हे वन विभागा अंतर्गत संरक्षित केलेले आहे. किल्ल्याच्या भौगोलिक आणि लष्करी दृष्ट्या संरक्षणाच्या उद्देशाने विविध कालखंडात किल्ल्यावर बांधकामे आणि त्यांची डागडुजी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राचीन व मध्युगीन कालखंडातील स्थापत्याच्या खुणा आजही येथे निदर्शनास येतात. डोंगराचे कडे तासून त्यावर केलेले बांधकाम, खडकात खोदलेले मोठे टाके, कोठारे, वाड्याची इमारत, घरांचे जोते अशा अनेक वास्तूंचे अवशेष आजही येथे अस्तित्वात आहेत. शिलालेखांमध्ये या किल्ल्यावरील बांधकाम व त्याकाळातील राजवटीची माहिती मिळते. त्यामुळे या किल्ल्याचे महत्त्व विविध कालखंडात फार मोठे होते, असे निदर्शनास येते. किल्ल्याची ऐतिहसिक पार्श्वभूमी पाहता सातवाहन, पोर्तुगीज, गुजरातचा सुलतान, देवगिरीचे यादव, आदिलशहा, निजामशहा, मराठे आणि इंग्रज या राजवटी इथे होऊन गेल्या आहेत. तसेच आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य देखील या किल्ल्यावर होते, असे सांगितले जाते.

मागील ठाकरे सरकारच्या काळात, राज्याचे माजी वनविभाग प्रमुख सुनील लिमये यांनी गणेश रघुविर यांना महाराष्ट्रातील वनविभागातील गड-किल्यांची सद्यस्थिती, तेथील पर्यटनविकासाबाबत अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार, त्यांना अहवाल सादर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर वनविभागाने कर्नाळा किल्ल्यावर काही दुरुस्ती कामे केली होती. त्याची पाहणी आणि व्यक्तिगत अभ्यासदौऱ्यासाठी गणेश रघुविर हे स्थानिक शिरढोन गावातील सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य मयुर टकले यांच्यासोबत १६ जूनला कर्नाळा किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना किल्ल्यावर नव्याने एक भुयार आढळून आले. या किल्ल्यावर आधीच दोन भुयारे अस्तित्वात आहेत. पण, स्थानिक लोक त्यांना पाण्याच्या टाक्या समजतात.

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक पायवाट जाते. या वाटेने दोन मिनिटे चालत गेले असता, कातळात खोदलेले पहिले कोरीव भुयार दिसते. हे एल आकाराचे आहे. याचे तोंड ३ बाय ३ फूट एवढे असून, ६ फूट खोल व तळाशी ३ बाय ३ फूट आकारचे तोंड असून, ते १० फूट खोल कोरलेले आहे. तर दुसरे भुयार हे किल्ल्यावरील कर्णाई देवी मंदिरासमोर पत्राच्या शेडच्या उजव्या बाजूला एक मोठा घराच्या जोत्याचा चौथरा आहे. त्यावरून डाव्या बाजूच्या कडे कडेने गेले असता, तेथे कातळात खोदलेले आहे. स्थानिक लोक त्याला पाण्याची टाकी म्हणतात. पण, ती पाण्याची टाकी नसून, तेही एल आकाराचे भुयार आहे. त्याचे तोंड हे अडीच बाय अडीच फूट चौकोनी आकाराचे असून, हे भुयार साधारण ६.३ फूट खोल आहे. त्याच्या तळाशी २ बाय २ फूट आकाराचा चौकोनी भाग कोरला असून, आत ८ ते १० फूट लांब एवढा कोरीव भाग आहे.
Abhishek Bachchan:अभिषेक बच्चनने मुंबईत १ नव्हे तर ६ अपार्टमेंटची केली खरेदी, कोट्यवधींची किंमत ऐकूनच चक्रावाल!
याच ठिकाणी नव्याने तिसरे भुयार आढळले. भुयार क्रमांक २च्या पुढे ८० फुटांवर कातळाच्या कडेला आणखी एक कोरीव भुयार आहे. हे भुयार ८० टक्के मातीने बुजले असून, याचे तोंड अडीट फूट लांब आणि दीड फूट रुंद असून, आतमध्ये साधारण १० फूट खोल आहे. यातील मातीचा गाळ काढल्यावर याचा मूळ आकार निदर्शन येईल. या भुयारासमोर मोठे गवत वाढले असून, झुडपेही आहेत. या वास्तूचे अक्षांश आणि रेखांश, तसेच जीपीएस लोकेशनची नोंदही करण्यात आली आहे. ही भुयारे किल्ल्याच्या प्राचीन कालखंडातील दुर्ग अवशेषांच्या अस्तिवाच्या खुणा आहेत. यावरून किल्ल्याची निर्मिती ही प्राचीन कालखंडात झालेली आढळते. तसेच लवकरच किल्ल्याच्या परिसरतील, घेरऱ्यातील पुरावषेशांची माहिती मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे गणेश रघुविर आणि मयूर टकले यांनी सांगितले.

तपसाधना, विश्रांतीसाठी भुयारांचा वापर

अशा प्रकारची भुयारे राज्यातील पेब, प्रबळगड, तुंगा, लोह गड आदी किल्ल्यांच्या पायथ्याशी अशाप्रकारची भुयारे किल्ल्यांवर आढळतात. सुरुवातीला या भुयारांमध्ये बौद्ध भिक्खू हे साधनेसाठी करीत असावेत असे दिसून येते. नंतरच्या काळात हा मार्ग व्यापारासाठी वापरला जात होता. कोकणातून बोर घाटावर जाणारा हा मार्ग होता. त्यामुळे येथे विश्रांती या भुयारांचा वापर केला जात असावा, असे रघुविर यांनी सांगितले.