राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट पक्षाला मिळालेले यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५८ वा वर्धापन दिन बुधवारी मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे दणक्यात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत, अॅड. लिलाधर डाके, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे तसेच सर्वच नवनिर्वाचित खासदार, पक्षाचे आमदार मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्यात पहिल्यांदाच भास्कर जाधव यांना भाषणाची संधी मिळाली. त्यांनी जोरदार भाषण ठोकून शिवसैनिकांच्या तुफान टाळ्या मिळवल्या तर ठाकरेंची शाबासकीही मिळवली.
२३ खासदारांवरून ९ खासदार झाले, कसल्या स्ट्राईकच्या गोष्टी सांगताय?
उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र ढवळून काढला. आज निवडणुकीची वेगवेगळी विश्लेषणे केली जाताये, कोण स्ट्राईक रेट सांगतंय. काही जणांकडे गृहखाते अनेक वर्षे असल्यामुळे आकड्यांशी त्यांचा संबंध अधिक असावा, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. अरे तुम्ही तर ४५ प्लस सांगत होतात, मग काय झालं? स्ट्राईक रेटच्या गोष्टी कुणाला शिकवताय, तुमचे २३ होते, आता तिघांचे मिळून १७ आले… आमचे ५ होते, आत्ता पाचाचे ९ झाले, आमचा २०० चा स्ट्राईक होता, आमच्या नादाला लागू नका, असा इशाराच त्यांनी दिला.
आम्ही मोदींचा फोटो लावला नाही, हे लक्षात घ्या!
मोदींचा फोटो लावल्याने आम्ही निवडून आलो, असे म्हणून आम्हाला हिणवायचे. पण आज मोदींचा फोटो नाही तर उद्धवजींचा फोटो लावून आमचे ९ खासदार निवडून आणले, पण तुमच्या सगळ्या उमेदवारांच्या बॅनरवर तर आमच्या बाळासाहेबांचा फोटा होता ना… असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.